Table of Contents
मृद व जल संधारणाच्या पध्दती : नैऋत्य मोसमी वाऱ्यांबरोबर येणाऱ्या पावसाचे प्रमाण विदर्भात ७५० ते १३०० मि.मी. आहे. सर्वसाधारण कोरडवाह पिकांची पाण्याची गरज पाहिली तर हा पाऊस पुरेसा आहे. परंतु पडणारा पाऊस हा मान्सूनच्या चार महिन्यात ४० ते ४५ दिवसात पडतो. पावसाची गती एवढी जास्त असते की साधारणतः १६ ते २० टक्के पाणी भूपृष्ठावरून वाहत जाउन नदी-नाल्याव्दारे समुद्रास मिळते. सोबतच अमूल्य अशी माती व अन्नद्रव्ये सुध्दा वाहून जातात. अशाप्रकारे व्यर्थ जाणान्या पावसाच्या पाण्याला जागोजागी अडविले किंवा जिरविले तर कोरडवाह शेतीला दरवर्षी भेडसावणाऱ्या पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता कमी होऊन वाहून जाणाऱ्या मातीचे सुध्दा संरक्षण होईल.

पावसाचे पाणी अडवून साठविण्याच्या वेगवेगळ्या तंत्राची विभागणी प्रामुख्याने पाण्याची जेथे साठवण केली जाते त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे करता येईल.
अ) मूलस्थानी जल संधारण
पिकांच्या योग्य वाढीसाठी जेथे पाऊस पडतो तेथेच त्याची साठवण जास्तीत जास्त प्रमाणात करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. यालाच मूलस्थानी जल व्यवस्थापन म्हणतात, ते खालील पध्दतीने साधता येईल.
१) उतारास आडवी पीक पध्दत
पिकांची लागवड नेहमी उतारास आडवी (शक्यतोवर समपातळीवर) केल्यास पावसाचे पाणी सर्व भागावर सारख्या प्रमाणात मुरण्यास मदत होते. पिकांची मशागत उतारास आडवी केल्याने पावसाचे पाणी वेगाने शेताबाहेर वाहन न जाता मशागतीमुळे निर्माण झालेल्या वरंब्यांना अडते, त्याचा वेग मंदावतो व शेतात मुरते. या प्रकारच्या पीक पध्दतीस उतारास आडवी (समतल) पीक पध्दत असे म्हणतात. जेव्हा शेतजमिनीचा उतार एक टक्क्यापेक्षा जास्त असेल तेव्हा ही पध्दत जरूर अंमलात आणावी. ठराविक अंतरावर मार्गदर्शक समतल गवती बांध (खस किंवा इतर गवताचे) टाकल्यास पेरणी व इतर मशागतीस दिशा मिळते व पावसाचे पाणी जमिनीत जास्त मुरते.
२) भूसंवर्धित मशागत
उघाडीच्या काळात पिकाची योग्य आंतरमशागत केल्याने जमीन भुसभुशीत राहते व पावसाचे पाणी मुरण्याची क्रिया वाढते. अशी आंतरमशागत करताना डवऱ्याच्या जानकुळास दोरी बांधून दोन पीक ओळीमध्ये सरो तयार केल्यास जास्तीचे पाणी साठवून शेतातच जिरविण्यास मदत होते आणि त्याचा पिकाला फायदा होतो. सोबतच ३ ते ४ वर्षातून खोल नांगरणी करावी, जेणे करून भूपृष्ठाखाली टणक पापुद्रा तयार होणार नाही.
३) बांधबंदिस्ती
कमी पावसाच्या क्षेत्रात (६०० मि.मी. पर्यंत) हलक्या व मध्यम प्रतीच्या जमिनीत १ ते ६ टक्के उतारा पर्यंत दोन बांधामधील वाहत येणारे पाणी समपातळी बांधाच्या वरच्या बाजूस अडवून जिरवले जाते. जेव्हा वार्षिक पर्जन्यमान ६०० मि.मी. पेक्षा अधिक आणि जमीन मध्यम ते भारी असेल तेव्हा समपातळी बांधाऐवजी काही विशिष्ट उतार देऊन (०.२ ते ०.६ टक्क्यापर्यंत) डाळीचे बांध टाकावेत. हे बांध अतिवेगाने वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याला नियंत्रित करून हळूहळू शेताबाहेर काढतात. या प्रकारच्या बांध बंदिस्तीने पावसाचे पाणी शेताबाहेर निघण्यास वेळ लागत असल्याने, ते काही प्रमाणात शेतात जिरविण्यास मदत होते, व मातीची धुप कमी होते. दोन बांधामधील अंतर २ ते ३ टक्के उतारासाठी ६० ते ७० मिटर ठेवावे.
४) सपाट ओटे किंवा समतल चर
डोंगराळ भागात किंवा जास्त उताराच्या क्षेत्रात (६ टक्क्याचे वर) वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे होणारी मातीची धूप थांबविण्यासाठी व जलसंधारणासाठी मातीच्या खोलीनुसार सपाट ओटे किंवा समतल चर पध्दतीचा अवलंब करावा. मातीची खोली जास्त असेल तर जमिनीच्या उताराप्रमाणे कमी किंवा जास्त रूंदीचे (५ ते १५ मीटर) सपाट ओटे करून त्यावर योग्य त्या पिकाची लागवड करावी. परंतु मातीची खोली कमी असेल तर समतल सलग किंवा खंडीत चर खोदून ती वणीकरकण किंवा कुरण पिकासाठी वापरावी. या चराची खोली ३० ते ४५ सें.मी. व रुंदी ४५ ते ६० सें.मी. ठेवावी. दोन चरातील अंतर जमिनीच्या उताराप्रमाणे ५ ते १० मीटर ठेवावे. चरामध्ये अडलेले पावसाचे पाणी जमिनीत झिरपल्याने ओलावा सारख्या प्रमाणात पसरून तो दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. त्यामुळे जास्त किंवा कमी उताराच्या हलक्या जमिनीत नैसर्गिक वनस्पतीची व गवताची वाढ चांगली होते.
५) उतारास आडव्या खोल सरी
समतल सलग चर ही थोडी खर्चाची बाब आहे. जेव्हा हा खर्च करणे शक्य नसेल तेव्हा वरील प्रमाणेच समपातळीदर्शक रेषेवर किंवा उतारास आडव्या खोल सरी नांगराच्या सहाय्याने ५ ते ६ मीटर अंतरावर काव्यात. सरी काढताना निघालेली माती उताराच्या खालच्या बाजूने पडेल याची दक्षता घ्यावी. या ‘व्ही’ आकाराच्या मध्ये खालच्या बाजूवर झाडांची लागवड करावी. या पध्दतीमध्ये सुध्दा पावसाचे भरपूर पाणी जमिनीत जिरविले जाते व पिकांची चांगली वाढ होते.

ब) भूपृष्ठावरील पाणी साठवण
पावसाळ्यात सतत येणाऱ्या पावसामुळे वर उल्लेखलेल्या मूलस्थानी जल व्यवस्थापनेच्या उपाययोजनेनंतरही शेतातून बरेचसे पाणी वाहून जाते. तेव्हा शेताबाहेर वाहून जाणारे पाणी जागेच्या उपलब्धतेनुसार सपाट जमिनीवर योग्य त्या आकाराचे शेततळे तयार करून किंवा खोलगट भागात आडवा मातीचा बंधारा घालून साठविता येते अशाप्रकारे साठविलेल्या पाण्याचा उपयोग अवर्षण काळात पिकांना संरक्षक ओलीत देण्यासाठी होऊ शकतो.

१) शेततळे
सपाट ते कमी उताराच्या जमिनीवर शेततळ्याव्दारे पाणी साठविता येते. यासाठी मातीची खोली कमीत कमी २.५ ते ३ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. जास्त उताराच्या व मातीची खोली कमी असलेल्या जमिनीवर बोड्या अंतरापर्यंत खोदाई करून निघालेल्या मातीचा उतारास आडवा बांध घालूनही शेततळे तयार करता येते. शेततळ्याची जागा निश्चित करताना साठविलेल्या पाण्याचा योग्य रितीने उपयोग होऊ शकेल असे स्थळ निवडावे. शेततळ्यातील पाण्याचा बाष्पीभवनाव्दारे होणारा ऱ्हास कमी करण्याकरीता, शेतळ्याच्या बांधाची उंची जमिनीपासून २ ते २.५ मी. ठेवावी. ज्या ठिकाणी पाणी झिरपण्याचा वेग जास्त आहे अशा ठिकाणी तळ्याच्या सर्व बाजूचे व तळाचे पॉलिथीन फिल्मने अस्तरीकरण करून घ्यावे. शेततळ्याचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्राच्या २ ते ३ टक्क्यांपर्यंत असावे. साधारणतः पश्चिम विदर्भात २ हेक्टर क्षेत्राकरिता २० मी. x २० मी. x ३ मी. (८७६ घनमीटर) आकारमानाचे शेततळे खोदावे. शेततळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याकरिता ज्या क्षेत्रात मृद संधारणाची कामे झाली आहेत तेथेच घ्यावेत, जेणेकरून पाण्यासोबत शेततळ्यात माती येण्याचे प्रमाण कमी राहील व पाण्याची साठवण योग्य प्रमाणात होईल.
शेततळ्याचे अस्तरीकरण :
शेतकऱ्यांच्या शेतावर शेततळे तयार केल्यानंतर शेततळ्यात पावसाचे साठविलेल्या पाण्याचा संरक्षित सिंचिनासाठी उपयोग व्हावा व पीक उत्पादन वाढावे असे अपेक्षित आहे. परंतु बहुतेक शेततळ्यास अस्तरीकरण न केलेले असल्यामुळे, शेततळ, यात साठवलेले पावसाचे पाणी जमिनीत मूरली जाते व त्याचा संरक्षित सिंचनासाठी उपयोग होत स्सल्याचे निर्देशनात येते. तेव्हा शेततळ्यांची उपयुक्तता वाढविण्यासाठी शेतळ्यास अस्तरीकरण करणे गरजेचे आहे. सध्या प्रचलित पध्दती प्रमाणे शेततळ्यास अस्तरीकरणासाठी एचडीपीई अॅग्रोफिल्म ५०० माईक्रॉन जाडीचे किंवा शिल्पॉलिन २५० माईक्रान जाडीचे अतीनिल प्रतिरोधक प्लास्टिक कापडाचा वापर करतात. सदर कापडांची सरासरी कार्यकाळ ४-५ वर्षे धरणयात येते. परंतु काळजीपूर्वक वापरल्यास जास्त काळ टिकू शकतो. शेततळ्यास अस्तरीकरण केल्यामुळे साठविलेल्या पाण्याचा जमिनीत मुरण्याचा दर ९९ टक्यांपर्यंत कमी होत असल्याचे निर्देशनात आले आहे. शेततळ्यात प्लास्टिक कापडाची यंत्र अस्तरीकरण करतांना कापडास घडड्यज्ञा राहणार नाही, जनावरे तळ्यात पडणार नाही किंवा इतर घटकांव्दारे फाटल्या जाणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. शेततळ्यातून होणारे बाष्पीभवन कमी करण्यासाठी तळ्यांच्या बाजुंनी झाडांची लागवड करावी. त्यामुळे वाऱ्याचा वेग कमी होवून बाष्पीभवन कमी होईल तसेच उन्हामुळे प्लास्टिक कापडाचा न्हास होणार नाही.
२) नाला बंडींग/सिमेंट नाला बांध
नाल्यामधून वाहत जाणाऱ्या पाण्याला त्याच्या पात्रात ठिकठिकाणी मातीचे किंवा दगड सिमेंटचे नाला बांध तयार करून अडवावे. साधारणपणे मातीच्या बांधासाठी जास्त जागेची गरज असते, त्यामुळे जेथे असे क्षेत्र उपलब्ध असेल तेथेच मातीचे नाला बंडींग केल्या जाऊ शकते. अशा प्रकारे अडविलेले पाणी नाल्यात अथवा बाजूच्या भागात जिरेल किंवा अवर्षण काळात पिकाच्या ओलितासाठी वापरता येईल. नाला बंडींगच्या कामामुळे सभोवतालच्या विहिरीच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते.
क) भूगर्भातील पाणी साठवण
भूगर्भातील पाणी हे पिण्याच्या व ओलितासाठी लागणाऱ्या पाण्याचा महत्वाचा /मुख्य स्रोत आहे. आपल्या राज्यात सध्या ओलिताखाली असलेल्या एकूण क्षेत्रापैकी विहिरीव्दारे भूगर्भातील पाण्याचा उपसा करून भिजणारे क्षेत्र ५५ टक्के आहे. भूगर्भातील पाण्याचा वापर केल्यानंतर पावसाळ्यात भूजल पातळी कायम ठेवण्यासाठी भूगर्भात पाण्याचा भराव करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी खालील उपाय योजावे.
१) पाझर तलाव
जेथे भूस्तरीय परिस्थिती पाणी पाझरास उपयुक्त आहे अशा ठिकाणी नाल्यात किंवा नाल्याच्या शेजारी तलाव खोदून, बंधारा बांधून त्यात पावसाचे पाणी साठवावे, अशाप्रकारे साठवलेले पाणी पाझरून तलावाच्या खालच्या बाजूस असलेल्या विहिरींना उपलब्ध होते, म्हणून शक्यतो पाझर तलाव विहिरी असलेल्या भागातच घेण्यात यावा. जेथे भौगोलिक परिस्थिती मोठ्या तलावास योग्य आहे परंतु पाझर तलाव शक्य नाही अशा ठिकाणी लघु पाटबंधारे विभागातर्फे बांधण्यात येणारे सिंचन तलाव बांधून, नाल्यातून वाहून जाणारे पाणी साठवून ते ओलितासाठी वापरावे.
२) जल शोषण खड़े
शिवारातील अपधावेचे पाणी ज्या ओघळी/ नाल्याद्वारे वाहत जाते, त्यावर योग्य त्या ठिकाणी स्थायी/अस्थायी उपायांव्दारे पाणी साठा केल्यानंतर, त्याव्दारे भूजल पुनर्भरण करता येते. परंतु तिथे जर जमिनीचा (नाल्यातला) वरचा घर जास्त खोलीपर्यंत (२ ते ३ मीटर) काळ्या मातीचा असेल व त्यानंतर भुसभुशीत मातीचा स्तर किंवा सच्छिद्र खडकअसेल तर अशा क्षेत्रात वरची कमी पाणी शोषण क्षमतेची माती खोदून असे खड्डे दगड, विटांचा चुरा, कोळसा व रेती इत्यादीव्दारे भरून तेथे जलशोषण खड्डे तयार करावेत. अशाप्रकारे पाणी साठविलेल्या प्रक्षेत्रावर योग्य ठिकाणी तयार केलेल्या जलशोषण खड्ड्यांव्दारे भूगर्भातील पाणी साठा वाढविता येतो. सच्छिद्र खडकाची भुपृष्टापासून खोली ३ ते ४ मीटर पेक्षा जास्त असल्यास, त्याठिकाणी एक फूट व्यासाचे बोअर घेऊन ते बारीक गिट्टी, कोळसा व रेतीने भरून पुनर्भरण करावे.
३) भूमिगत बंधारा
नाल्याच्या तळाखाली बांधण्यात येणाऱ्या बांधास भूमिगत बंधारा म्हणतात. असे बांध काळ्या चोपण मातीचे असतात व ते ज्या नाल्याचे तळात रेतीचे प्रमाण जास्त आहे किंवा त्याची सच्छिद्रता जास्त आहे, अशा ठिकाणी बांधावे. भूपृष्टावरील पाणी जसे उंचवट्यावरुन सखल भागाकडे (उताराच्या दिशेने) नाल्यातून वाहत जाते, अगदी तसाच पाण्याचा प्रवाह नाल्याच्या तळाखालूनसुध्दा वाहत (कमी वेगाने) असतो. हा तळाखालून वाहत जाणारा पाण्याचा प्रवाह अडवून नाल्याचे दोन्ही बाजूच्या क्षेत्रात पसरवून भूगर्भातील जलसाठा वाढविण्यासाठी भूमिगत बंधारा उत्तम उपाय आहे. असा बंधारा तयार करण्यास नाल्याच्या पात्रात खोदावयाच्या चरी, नाल्याच्या रूंदीएवढ्या लांब, २ ते ३ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त रूंद व कठीण खडक लागेपर्यंत खोल (३ ते ४ मीटर) खोदाव्यात. त्या चरी चोपण मातीने धुम्मस करून घट्टपणे भरून घ्याव्यात, जेथे योग्य प्रकारची काळी माती उपलब्ध नसेल, तेथे चरीत योग्य जाडीची पॉलिथीन शीट उभी करून त्याच मातीने चर भरून घ्यावा. अशा प्रकारचे भूमिगत बंधारे नाल्याच्या उतारानुसार एकाखाली एक असे ठराविक अंतरावर घ्यावेत. त्यामुळे बंधाऱ्याचे वरील क्षेत्रातील भूजलाची पातळी वाढते व त्या क्षेत्रातील विहिरींव्दारे होणारी सिंचन क्षमता वाढविता येते.
४) विहीर पुनर्भरण
शेतात बाहेरून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी येत असेल किंवा शेतात विहिरीच्या बाजूला पाणी साठत असेल अथवा विहिरी जवळून छोटासा ओहळ वाहत असेल तर विहीर पुनर्भरण करता येते. यासाठी विहिरीपासून काही अंतरावर ८ x ६ x ६ फूट आकाराचा हौदासारखा खड्डा खोदावा. या खड्ड्याच्या उताराकडील विहिरीच्या दिशेने एक लहान खड्डा (४x ४ x ६ फूट मापाचा) खोदावा.
हा खड्डा खोदताना विहिरीपासून त्याचे अंतर १० फूट असेल याची काळजी घ्यावी. नंतर हा खड्डा शोष खड्ड्यासारखा दगड, वाळू, कोळसा यांचे थर देऊन भरून घ्यावा. या खड्ड्यातून विहिरीस जोडणारा पाईप बसवावा. यासाठी शक्यतोवर ९ इंच व्यासाचा सिमेंट पाईप वापरावा. हा पाईप विहिरीच्या भिंतीपासून एक फूट समोर आणावा.
उतारामुळे वाहत येणारे पाणी पहिल्या खड्ड्यात येऊन साठते. पाण्याबरोबर काही प्रमाणात गाळही येतो व तो खड्ड्यात खाली बसतो. हा खड्डा पाण्याने भरल्यानंतर हे पाणी विहिरीकडील उताराकडे असणाऱ्या दुसऱ्या खड्ड्यात येते. हा खड्डा शोष खड्ड्याच्या तत्वानुसार असल्याने त्यात येणारे पाणी पाईपव्दारे गाळून विहिरीत पडते. तसेच या पाईपास खड्ड्याच्या आतल्या बाजूने जाळी लावावी. त्यामुळे कचरा विहिरीत पडणार नाही.
पहिल्या खड्ड्यात पाण्याबरोबर वाहून येणारा गाळ नंतर काढून शेतात वापरावा. त्यामुळे पाण्याबरोबर मातीचे ही संवर्धन आपोआप केले जाते. जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहणारे पाणी विहिरीत आणल्याने विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. हे साधे, सोपे व सर्वांना जमेल असे तंत्र आहे. असा कार्यक्रम सामुहिक पध्दतीने गावकऱ्यांनी एकत्र येऊन गावातील ४० ते ५० टक्के विहिरीवर केल्यास गावाच्या भूगर्भातील पाणी साठ्यात भरीव वाढ होऊन सिंचनाचे व पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडविणे सहज शक्य आहे. मात्र ज्या विहिरी केवळ पिण्याच्या पाण्यासाठी वापरल्या जातात तेथे विहीर पुनर्भरण करू नये. कारण विहिरीतील पाणी दूषित होण्याचा संभव असतो.
५) नदी/नाला रूंदीकरण व खोलीकरण
आपल्या शेतातून बाहेर जाणारी अपधाव, त्याच्या पाणलोटातून वाहणाऱ्या नदी/नाल्यामध्ये येते. अपधावेव्दारे वेणाऱ्या पाण्याबरोबर सुपीक माती सुध्दा वाहून येते. ही माती नदी/नाल्यामध्ये बांधलेल्या निरनिराळ्या उपचार पध्दती (उदा. सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, धरण इ.) मध्ये पाण्यासोबत साठविली जाते. पाण्याबरोबर आलेला गाळ सुध्दा नदी/नाल्यांमध्ये साठविला जातो. त्यामुळे सदर उपचार पध्दतीची पाणी साठवण क्षमता कमी होते. नाल्याची खोली आणि त्याच्या तळाचा उतार कमी होतो. त्यामुळे पुर पातळी वाढते व त्यामुळे आजुबाजूच्या शेत शिवारात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच पाणी साठवण क्षमता कमी झाल्यामुळे त्या उपच्याराचे उपयुक्त आयुष्यमान कमी होते. तसेच मुजल पुर्नभरण सुध्दा घटते. असे अनेक प्रकारे होणारे नुकसान फक्त नदी/नाल्यामध्ये, धुपेव्दारा साठणाऱ्या मातीमुळे होते.
महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत राबविलेल्या निरनिराळ्या पाणलोट क्षेत्र आधारीत मृद व जल संधारण उपचार पध्दतीमुळे ठिकठिकाणी जमिनीच्या धुपेला प्रतिबंध होऊन पाणलोटातील पाणी साठवण वाढले आहे. त्याचबरोबर नदी/नाल्यामध्ये आजपर्यंत साठलेल्या गाळामुळे होत असलेले नुकसान टाळण्यासाठी, मोठ्या प्रमाणावर नदी/नाल्यामधील गाळ काढण्याची मोहीम सुरू झाली आहे. नाल्यामधील निरनिराळ्या उपचार पध्दतींपासून मिळणारे फायदे अबाधीत राखण्यासाठी नाल्याचे रूंदीकरण व खोलीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. सिमेंट बंधाऱ्याला तसेच इतर उपध्याराला कोणताही धोका न पोहचविता नाल्याचे खोलीकरण व रूंदीकरण करावे. त्यामुळे तेथील पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ होऊन भूगर्भातील पाण्याचे पुर्नभरणामध्ये सुध्दा वाढ होईल. त्याचबरोबर नाल्यातून निघालेला/काढलेला गाळ हा अतिशय सुपिक असल्यामुळे माती परिक्षणानुसार त्याचा वापर, पडीक जमिनीवर किंवा हलक्या ते मध्यम जमिनीवर केल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. त्यामुळे उत्पादकता वाढण्यास मदत होईल. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी निरनिराळ्या शासकीय/अशासकीय संस्था, निरनिराळ्या व्यक्ती स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात नदी/नाले रूंदीकरण आणि खोलीकरण कार्यक्रम राबवित आहेत. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत यशस्वीरित्या राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे, ठिकठिकाणी याचे विहीरीतील पाणी पातळीत वाढ, वर्षभर पाण्याची उपलब्धता यासारखे चांगले फायदे आढळून आले आहेत.
ड) शेतातून अपधावेव्दारे बाहेर जाणाऱ्या मातीचे संधारण
शेतातून अपधावेव्दारे बाहेर जाणाऱ्या मातीचे संधारण योग्य प्रकारे केल्यास त्यामुळे विविध प्रकारे निर्माण होणारे नुकसान मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे खबरदारी घेणे आवश्यक आहे.
मृद व जल संधारण म्हणजे काय?
मृद व जल संधारण म्हणजे पावसाचे पाणी जमिनीत साठवून ठेवणे आणि मातीची धूप टाळणे, जेणेकरून शेतीसाठी पाणी टिकून राहील.
विदर्भात पावसाचे सरासरी प्रमाण किती आहे?
विदर्भात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे पावसाचे सरासरी प्रमाण ७५० ते १३०० मि.मी. इतके असते.
उतारास आडवी पीक पद्धती का उपयुक्त आहे?
कारण या पद्धतीने पावसाचे पाणी शेतात मुरते व मातीची धूप थांबते.
भूसंवर्धित मशागत म्हणजे काय?
पावसाळ्यापूर्वी शेतात योग्य आंतरमशागत करून पाणी मुरण्याची प्रक्रिया वाढवणे म्हणजे भूसंवर्धित मशागत.
बांधबंदिस्तीचे फायदे कोणते?
पावसाचे पाणी शेतात साचून राहते, मातीची धूप थांबते आणि ओलावा टिकतो.
समतल चर कसे उपयोगी आहेत?
हे चर पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवतात व दीर्घकाळ ओलावा टिकवतात.
शेततळे म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे?
शेततळे म्हणजे पावसाचे पाणी साठविण्यासाठी खोदलेली खोल जागा. यासाठी कमीत कमी २.५ ते ३ मीटर खोली आवश्यक आहे.
शेततळ्यास अस्तरीकरण का आवश्यक आहे?
पाणी जमिनीत मुरू नये म्हणून शेततळ्यास प्लास्टिक फिल्मने अस्तरीकरण करणे उपयुक्त ठरते.
पाण्याचा बाष्पीभवन रोखण्यासाठी उपाय काय आहेत?
शेततळ्याच्या बाजूने झाडे लावल्याने वाऱ्याचा वेग कमी होतो आणि बाष्पीभवन कमी होते.
ही सर्व पद्धती कोरडवाह भागात किती उपयोगी आहेत?
या सर्व पद्धती कोरडवाह भागात जलसंधारण वाढवून उत्पादनात स्थिरता आणतात आणि सिंचनाची गरज कमी करतात.
what are the different methods of soil conservation
Methods of Soil Conservation:1. Agronomic: Crop rotation, contour farming, strip cropping, mulching, cover crops.2. Mechanical: Terracing, contour bunding, check dams, gully plugging.3. Vegetative: Afforestation, shelterbelts, grassed waterways, agroforestry.4. Fertility Management: Organic manure, compost, balanced fertilizers.