पेरणीपूर्वी जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणून घेऊन पिकाच्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याकरिता माती परीक्षण करून त्यानुसार खतांचा वापर करणे आवश्यक आहे समस्यायुक्त जमिनींचे योग्य निदान करण्यासाठी सुध्दा माती परिक्षण करण्याची गरज असते. त्याचप्रमाणे कोणत्याही फळझाडाची लागवड करण्यापूर्वी जमिनीची त्या-त्या फळझाडासाठीची योग्यता तपासून पाहणे अत्यंत महत्वाची बाब आहे. म्हणून माती परीक्षण करणे आवश्यक ठरते .
माती परीक्षणाचे महत्व
Table of Contents

परीक्षणासाठी नमुने गोळा करणे :
अ) मातीचा नमुना (रासायनिक खताच्या शिफारसीसाठी )
१ शेताची प्रथम पाहणी करून जमिनीच्या प्रकारानुसार उदा जमिनीचा रंग, खोली, उतार आणि उत्पादकतेनुसार विभाग करून प्रत्येक विभागातून एक प्रातिनिधिक नमुना परीक्षणासाठी घ्यावा
२ नमुना घ्यावयाच्या जागेवरील काडीकचरा बाजूला करून १५ ते २० सें मी. खोलीपर्यंत ‘व्ही’ आकाराचा खड्डा करावा. खड्ड्याच्या पृष्ठभागापासून तळापर्यंतची माती गोळा करावी. अशा रितीने आवश्यकतेनुसार ५ ते १० ठिकाणची माती एकत्र करावी व त्यामधून अर्धा किलो प्रातिनिधिक नमुना परीक्षणासाठी घ्यावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी नमुना घ्यावयाचा असल्यास खड्ड्याच्या १ इव जाडीच्या कडा लाकडी कामचीने प्रथम खरडून काढावी व जमा झालेली माती काढून टाकावी. पुन्हा १ इंच जाडीचा मातीचा थर लाकडी कामचीने काढून तो परीक्षणासाठी एकत्र करावा
३. नमुन्यामधील काडीकचरा, पाने, मुळे काढून माती कागदावर पसरवून सावलीत वाळवावी व नंतर स्वच्छ धुतलेल्या कापडी पिशवीत किंवा प्लॅस्टीकच्या पिशवीत माती भरून आवश्यक माहितीसह प्रयोगशाळेत पाठवावी.
मातीचा नमुना किती खोलीपर्यंत घ्यावा ?
१. ज्वारी, भात, भुईमूग, गहू इत्यादी १५ ते २० सें.मी.
२. कपाशी, ऊस, केळी ३० सें.मी.
३. फळझाडांच्या बुंध्यापासून १ ते १.५ फूट सोडून बाहेरच्या परिघामधून ३० सें.मी

मातीचा नमुना कसा व कोठे पाठवावा ?
मातीचा नमुना प्रयोगशाळेत पाठविताना प्रत्येक नमुन्यासोबत माहितीचे पत्रक भरून पाठवावे शेतकऱ्याचे नाव वाता, शेत सर्वे क्रं., मागील हंगामात घेतलेली पिके, पुढील हंगामात घ्यावयाची पिके इत्यादी. मातीचे नमुने व तपासणी शुल्क, विभाग प्रमुख, मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र, डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला ४४४ १०४ या पत्यावर पाठवावे.
माती परीक्षण अहवालानुसार निष्कर्ष –
प्रयोगशाळेत मातीच्या नमुन्याचे आम्ल विम्ल निर्देशांक (सामू), विद्राव्य क्षारांचे प्रमाण (विद्युत वाहकता), सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश या गुणधर्मासाठी पृथःकरण करण्यात येते व त्यानुसार माती परीक्षण अहवाल तयार होतो. या अहवालावरून जमिनीत अन्नद्रव्ये किती प्रमाणात उपलब्ध आहेत याची माहिती मिळते व त्यानुसार पिकांचे प्रकार लक्षात घेऊन सेंद्रिय व रासायनिक खतांच्या मात्रा सुचविण्यात येतात.
सामू (आम्ल-विम्ल निर्देशांक) | |
प्रमाण | निष्कर्ष |
१) ७.०० पेक्षा कमी | आम्ल युक्त |
२) ७.०० ते ८.५० | पिकास मानवणारे (सर्वसाधारण) |
३) ८.५१ ते ९.०० | विम्ल युक्त |
४)९०० पेक्षा जास्त | अति विम्लयुक्त (नुकसान कारक) |
क्षारता (विद्युत वाहकता)
प्रमाण | निष्कर्ष |
१) १.०० पर्यंत | सर्वसाधारण |
२) १.०१ते२.०० पर्यंत | पीक उगवणीस नुकसानकारक |
३)२०१ते३.०० पर्यंत | क्षार सवेदनाक्षम, पिकाच्या वाढीस नुकसानकारक |
मुख्य अन्नद्रव्यांची जमिनीतील उपलब्धतेनुसार वर्गवारी आणि माती परीक्षणावर आधारित खतांची मात्रा
अ. न. | सेंद्रिय कर्ब (%) | उपलब्ध नत्र (कि./हे ) | उपलब्ध स्फुरद (कि./हे ) | उपलब्ध पालाष (कि./हे ) | वर्गवारी | शिफारसीत मात्रेपेक्षा कमी जास्त खत मात्रा द्यावी. |
1) | ०.२० पेक्षा कमी | १४० पेक्षा कमी | १५ पेक्षा कमी | १२० पेक्षा कमी | अत्यंत कमी | ५०% जास्त |
2) | ०.२१ ते ०.४० | १४१ ते २८० | १६ ते ३० | १२१ ते १८० | कमी | २५% जास्त |
3) | ०.४१ ते ०.६० | २८१ ते ४२० | ३१ ते ५० | १८१ ते २४० | माध्यम | शिफारस केलेली मात्रा |
4) | ०.६१ ते ०.८० | ४२१ ते ५६० | ५१ ते ६५ | २४१ ते ३०० | साधारण भरपूर | १० % कमी |
5) | ०.८१ ते १.० | ५६१ ते ७०० | ६६ ते ८० | ३०१ ते ३६० | भरपूर | २५ % कमी |
6) | १.० पेक्षा जास्त | ७०० पेक्षा जास्त | ८० पेक्षा जास्त | ३६० पेक्षा जास्त | अत्यंत भरपूर | ५०% कमी |
उदा : जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या वर्गवारीनुसार संकरित ज्वारी पिकासाठी रासायनिक खतांच्या मात्रा काढणे. संकरित ज्वारीसाठी शिफारस केलेली मात्रा ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रती हेक्टरी.
अन्नद्रव्यांच्या माती परीक्षणानुसार द्याव्या लागणाऱ्या मात्रा (किलो/हेक्टर)
अ. क्र. | अन्नद्रव्यांची वर्गवारी | नत्र | स्फुरद | पालाश |
१. | अत्यंत कमी | ८०+४०=१२० | ४०+२०=६० | ४०+२०=६० |
२. | कमी | ८०+२०=१०० | ४०+१०=५० | ४०+१०=५० |
३. | मध्यम | ८०+००=८० | ४०+००=४० | ४०+००=४० |
४. | साधारण भरपूर | ८०-०८=७२ | ४०-०४=३६ | ४०-०४=३६ |
५. | भरपूर | ८०-२०=६० | ४०-१०=३० | ४०-१०=३० |
६. | अत्यंत भरपूर | ८०-४०=४० | ४०-२०=२० | ४०-२०=२० |
सूक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीतील उपलब्धतेनुसार वर्गवारी
वर्गवारी | उपलब्ध मूलद्रव्ये (पीपीएम) | |||
जस्त | लोह | मँगनीज | तांबे | |
कमी | ०.६ पेक्षा कमी | ४.५ पेक्षा कमी | २.० पेक्षा कमी | ०.२ पेक्षा कमी |
मध्यम | ०.६ ते १.८ | ४.५ ते १८.० | २.० ते ८.० | ०.२ ते ०.८ |
भरपूर | १.८ पेक्षा जास्त | १८.० पेक्षा जास्त | ८.० पेक्षा जास्त | ०.८ पेक्षा जास्त |
फळबागेसाठी जमिनीची निवड करताना मातीचा नमुना घेण्याची पध्दत.

फळबागांसाठी जमिनीची निवड करताना माती परीक्षण करून घेणे अत्यंत जरूरीचे आहे. फळझाडांची मुळे जमिनीत खोल जात असल्यामुळे उथळ जमिनी फळबागेसाठी अयोग्य ठरतात. जमिनीत दीड मीटर किंवा मुरूम लागेपर्यंत खोल खड्डा करून मातीचे नमुने घ्यावेत. याकरिता जमिनीच्या गुणधर्मानुसार किंवा प्रकारानुसार विभाग पाडून प्रत्येक विभागात एक याप्रमाणे खड्डे करावेत.
खड्ड्याच्या उभ्या छेदाचे ० ते ३०, ३० ते ६०, ६० ते ९०, ९० ते १२० सें.मी. असे भाग पाडावेत व त्यानंतर प्रत्येक भागातून सारख्या जाडीचा मातीचा थर (साधारणतः अर्धा किलो) स्वच्छ घमेल्यामध्ये कुदळीच्या सहाय्याने जमा करावा व कापडाच्या पिशवीमध्ये भरावा. अशा त-हेने प्रत्येक थरामधून एक असे चार नमुने वेगवेगळ्या कापडी पिशवीमध्ये भरावे. कापडी पिशवीवर नमुन्याची खोली उदा. ० ते ३०, ३० ते ६० सें.मी., असे नमुने करावे. जर चुनखडीचा किंवा कठीण मातीचा थर आढळल्यास त्याच्या खोलीची व जाडीची नोंद करून त्या थराचा नमुना वेगळा घ्यावा. हे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यापूर्वी पिशवीत शेतकऱ्याचे नाव, शेत सर्वे क्रमांक, नमुन्याची खोली इत्यादी माहितीची चिड्डी टाकावी. अशा प्रकारे प्रत्येक खड्ड्यातून मातीचे वेगवेगळे नमुने जमा करावेत.
ओलिताच्या पाण्याचा नमुना
विहिरीवरील पंप साधारणपणे १५ ते २० मिनिटे सुरू ठेवून पाणी जाऊ द्यावे. नंतर नमुना घ्यावयाची काचेची किंवा प्लॅस्टीकची बाटली स्वच्छ धुऊन घ्यावी व त्यामध्ये विहिरीचे पाणी भरावे. नदी, नाले, कालवे यातील पाण्याचा नमुना हा प्रवाहाच्या मध्य भागातील असावा. त्याचप्रमाणे ज्या विहिरींवर इलेक्ट्रीक पंप बसविलेला नाही अशा विहिरीतील पाणी प्रथम चांगले ढवळून घ्यावे व नंतरच पाण्याचा नमुना परीक्षणासाठी घ्यावा. परीक्षणासाठी घेतलेल्या नमुन्याच्या बाटलीवर नाव, पत्ता, शेताचा सर्वे क्रमांक लिहून प्रयोगशाळेत पाठवावा.
जनावरांच्या मलमुत्रातील अन्नद्रव्य घटक
जनावरांचे शेण, मूत्र, गोठ्यातील काडीकचरा, झाडलोट करून निघालेले टाकाऊ पदार्थ आणि जनावरांना घातलेल्या वैरणीचे ऊर्वरीत अवशेष यांच्यापासून शेणखत तयार होते. हे सर्व पदार्थ जनावरांच्या मलमुत्राने माखलेले व भिजलेले असतात. साधारणपणे जनावरांच्या विष्ठेमध्ये ३ भाग शेण व १ भाग मूत्र असते. सर्वसाधारणपणे जनावरांच्या वजनाच्या प्रमाणात मलमूत्र मिळते.
जनावरांच्या ताज्या मलमूत्रामधील निरनिराळ्या घटकांचे व अन्नद्रव्यांचे सरासरी प्रमाण (%)
प्राणी | मलमूत्र | प्राणी | सेंद्रिय पदार्थ | खनिज पदार्थ | नत्र | स्फुरद | पालाश | कॅल्शियम |
गाय-बैल | शेण मूत्र | ८२.४ ९२.६ | १५.२ ४.८ | ३.६ २.१ | ०.४० १.०० | ०.२० ०.०१ | ०.१० १.३५ | ०.३६ ०.०१ |
शेळी-मेंढी | शेण मूत्र | ६०.३ ८६.३ | ३३.१ ९.३ | ४.७ ४.६ | ०.७५ १.३५ | ०.५० ०.०५ | ०.४५ २.१० | ०.४६ ०.१६ |
घोडा | शेण मूत्र | ७६.५ ८७.६ | २१.० ८.० | ३.६ ८.० | ०.५५ १.३५ | ०.३० ०.०१ | ०.४० १.२५ | ०.१७ ०.४५ |
डुक्कर | शेण मूत्र | ८०.७ ९६.६ | १७.० १.५ | ३.० १.० | ०.५५ ०.४० | ०.५० ०.१० | ०.४० ०.४५ | ०.०९ — |
कोंबडी | विष्ठा | ५७.० | २९.३ | — | १.४६ | १.१७ | — | ०.६२ |
खतांच्या वापराबाबत महत्वाचे मुद्दे.

खते विकत घेतांना दर किलो पोषक द्रव्याला काय किंमत पडते ते पाहणे आवश्यक आहे. ज्या खतात हा खर्च कमी देईल ते विकत घेणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरेल. चुनखडी असलेल्या जमिनीत अमोनियम सल्फेट किंवा युरिया जमिनीच्या पृष्ठभागावर दिल्यास बराचसा नत्र हवेत उडून जातो, म्हणून ही अथवा इतर नत्रयुक्त खते जमिनीत टाकल्यास ती मातीत मिसळावीत. पाऊस सुरू असताना युरिया ऐवजी अमोनियम सल्फेट देणे अधिक फायदेशीर ठरते. अति पावसाच्या प्रदेशात, हलक्या जमिनीत तसेच चिबड (पाणबसन) जमिनीत व धानाच्या पिकाला नायट्रेट खते देऊ नयेत. आम्ल जमिनीसोडून इतर जमिनीत, पाण्यात विद्राव्य असलेली स्फुरदयुक्त स्वस्त खते द्यावी. आम्ल जमिनीत पाण्यात अद्राव्य असलेली स्फुरदयुक्त स्वस्त खते दिली तरी चालतात.
खते बियाण्यासोबत मिसळून पेरल्यास बियाण्याला अपाय होण्याची शक्यता असते, म्हणून ती बियाखाली व बियांच्या बाजूला ५ सें.मी. खोल पेरून द्यावी. बी उगवल्यानंतर त्याची मुळे खतापर्यंत पोहोचतात व खतातील अन्नद्रव्यांचे शोषण करतात. खयुक्त खते एकदाच न देता अर्धी मात्रा पेरताना व उरलेली अर्धी मात्रा वरखत म्हणून पेरणीनंतर एक किंवा दोन हप्त्यात विभागून शिफारसीप्रमाणे द्यावी. वरखते पिकाच्या ओळींमधून अथवा रोपाभोवती द्यावी.
खते कोरडी राहण्यासाठी जमिनीपासून व भिंतीपासून ३० सें.मी. दूर ठेवावी. वेगवेगळी पोषक द्रव्ये पुरविणारी खते वेगवेगळी ठेवावी.
माती परिक्षण करून शिफारसीप्रमाणे पिकांना एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन पध्दतीनुसार खतांचा पुरवठा करावा. शिफारस केलेली शेणखताची मात्रा, रासायनिक खताची मात्रा आणि जैविक खते इत्यादींचा एकात्मिक वापर करणे गरजेचे आहे.
माती परीक्षण का करावे लागते?
मातीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता, आम्ल-विम्लता, क्षारता यांची माहिती मिळवण्यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक असते. यामुळे योग्य खत व्यवस्थापन करता येते आणि उत्पादन वाढवता येते.
मातीचा नमुना किती खोलीपर्यंत घ्यावा लागतो?
हे पिकाच्या प्रकारावर अवलंबून असते:
ज्वारी, गहू, भात: 15-20 से.मी.
ऊस, केळी: 30 से.मी.
फळझाडे: झाडाच्या परिघाबाहेरून 30 से.मी. खोलीने
माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा?
‘V’ आकाराचा खड्डा खोदून त्यातून एकसंध पद्धतीने माती गोळा करावी. 5 ते 10 ठिकाणचे नमुने एकत्र करून अर्धा किलो माती सावलीत वाळवून प्रयोगशाळेत पाठवावी.
मातीचा नमुना कोठे पाठवावा?
मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला 444104 येथे तपासणीसाठी नमुना पाठवावा.
माती परीक्षण अहवालात कोणती माहिती दिली जाते?
सामू (pH), विद्युत वाहकता (EC), सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश व सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता.
खताचे प्रमाण माती परीक्षणानुसार कसे ठरवले जाते?
मातीतील अन्नद्रव्यांची मात्रा लक्षात घेऊन शिफारशीपेक्षा कमी किंवा जास्त खत दिले जाते—for example, अत्यंत कमी नत्र असल्यास 50% जास्त नत्र द्यावे.
फळबागेसाठी माती नमुना वेगळा घेतात का?
होय. खोलवर खड्डा (90 ते 120 सेमी पर्यंत) करून वेगवेगळ्या थरांमधून मातीचे नमुने घ्यावेत.
ओलिताच्या पाण्याचा नमुना कसा घ्यावा?
पंप सुरू करून काही वेळानंतर मधल्या प्रवाहातून स्वच्छ बाटलीत पाणी घेऊन तपासणीसाठी पाठवावे.
सूक्ष्म अन्नद्रव्यांची तपासणी का आवश्यक आहे?
कारण झिंक, लोह, मँगनीज व तांबे ही अन्नद्रव्ये पिकाच्या वाढीसाठी अत्यंत गरजेची असून ती अनेकदा दुर्लक्षित राहतात.
खताचा खर्च कसा वाचतो?
माती परीक्षणामुळे अचूक अन्नद्रव्यांची गरज ओळखता येते. त्यामुळे अनावश्यक खत टाळून खताचा व शेतकऱ्याचा खर्च दोन्ही वाचतो.